....कवितेपाशी
Updated: Feb 10, 2021
अज्ञाताच्या जिवंत वाटांवर चालता चालता कुठल्याशा कवितेपाशी येऊन पोहोचणाऱ्या पावलांचा माग

लिखाणामध्ये मुक्तलेखन नावाची एक संकल्पना आहे. काहीही विचार न करता, कसल्याही संकल्पनेचा मागोवा न घेता त्या त्या क्षणी मनात जे जे येईल ते ते स्वैरपणे कागदावर उतरवत जाणे. बऱ्याचदा त्यात काही अर्धवट वाक्य, असंबद्ध परिच्छेद येत राहतात. हेतुतः न केलेल्या लिखाणात अचानक आपण कसल्याशा गोष्टीपाशी येऊन पोहोचतो आणि थबकून जातो. बऱ्याच वर्षांपुर्वीची, जेव्हा मी ध्यान शिकण्याकरिता सिद्ध समाधी योग नावाच्या संस्थेत जायचो, तेव्हाची गोष्ट. मनाला जखडून असलेल्या चाकोऱ्या तोडून मोकळं करण्याकरिता आम्हाला एक कल्पना सांगितली होती. तिचा वापर मी बहुतेक करून खूप कंटाळा आल्यावर करायचो. ती कल्पना अशीः जो रस्ता आपल्याला पूर्णपणे अनोळखी असेल त्या रस्त्याने जायचं. आपण त्या रस्त्याने कधीच गेलेलो नसतो. माहीतच नसतं, की ह्या रस्त्यावर काय काय आहे, त्याला काय काय आणि कशी कशी वळणं आहेत, तो कुठे जाऊन पोहोचतो वगैरे. मग तो जिथे कुठे आणि जसा घेऊन जाईल, तिथे आणि तसं जायचं. आम्ही त्याला अज्ञाताचा प्रवास म्हणायचो. निरुद्देश भटकंती करताना आपण अचानक कुठल्यातरी विलक्षण ठिकाणी जाऊन पोहोचतो. किंवा प्रवासात काही अशी वळणं घेत जातो जिथे मनाला एकदम सुखद किंवा दुःखद वाटतं.
ह्यामध्ये एक मेख आहे. माणसाच्या मनात नेहेमी अज्ञाताबद्दल एक भय असतं. त्यामुळे अशा गोष्टी करण्याकडे माणसाचा कल जास्त असतो ज्यात पुढे काय होणार हे एक तर माहीत आहे किंवा त्याचा बऱ्यापैकी अंदाज असतो. पण अज्ञाताचा प्रवास म्हणजे जोखीम. त्या रस्त्यावर जे काही लागेल ते जादूने कुणीतरी अंधारातनं आपल्यासमोर प्रकट झाल्यासारखं समोर येत असतं. त्यामुळे बऱ्याचदा त्यातनं मिळणारा अनुभव जास्त हृदयस्पर्शी होतो. मनात घर करून राहतो.
बहुतेक लेखक, कवी आणि कलाकारांच्या बाबतीत पण असंच होतं. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात जगत असताना आपल्यातील प्रत्येकाला काहीतरी अनुभव येत असतात. हे अनुभव घेणं सुद्धा एक प्रकारचा अज्ञाताचाच प्रवास असतो. त्यातील अचानक मिळालेल्या अनुभवाचा मनावर उमटलेला ठसा, त्याची तीव्रता आपल्यातील कवी, लेखक, कलाकार तितक्याच उत्कटतेने, तरलतेने त्यांच्या कलाकृतींमधून प्रतिबिंबित करत असतात. ही प्रक्रिया बघताना, अनुभवताना असं वाटतं जणू आपण एखादा चित्रपटच पाहतोय.
हे असेच लेखक, कवी, चित्रकार, शिल्पकारादी प्रभुतींचा त्यांच्या कलाकृतीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास असणारे हे प्रवासवर्णनात्मक शाब्दिक चित्रपट बघण्याच्या ओढीने मी इथे आलो. जे जे मिळेत ते ते टिपत, टिपलेलं चिवडत, त्यातनं मोलाचं वाटलेलं निवडत बिवडत जे हाती राहील ते सादर करीन म्हणतो. अशांचे शाब्दिक चित्रपट वाचूया जे अज्ञाताच्या जिवंत वाटा चालता चालता कुठल्याशा कवितेपाशी येऊन पोहोचले. ह्या घटकेला तरी वाटतंय की, भट्टी जमायला हरकत नाही. अर्थात, इथेही अनपेक्षित वळणं असणारच. पुढे काय होईल ह्याचा निश्चित असा थांग मलाही नाही. तेव्हा अशाच एका अज्ञाताच्या प्रवासाला निघालोय… बघूया, कसं काय होतंय ते.